‘ते’ फोन टॅपिंग रश्मी शुक्लांना भोवणार !

0
20210326_113853

रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार !

‘त्या’ अहवालासोबत पेन ड्राईव्ह नव्हता..

मुंबई, दि. 26 मार्च:
राज्यातील राजकारण ढवळून काढणारा फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याप्रकरणी अहवाल सादर केला असून या अहवालातून शुक्ला यांचे पितळ उघडं पडलं आहे.

कुंटे यांच्या अहवालानुसार, ‘गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल केली असून गुप्त अहवाल उघड करणे हे अत्यंत गंभीर आहे. हा अहवाल त्यांनीच फोडल्याचे उघड झाल्यास त्या कठोर कारवाईस पात्र ठरतील. दहशतवादी ‘कृत्ये, दंगली घडविणे अशा सार्वजनिक सुव्यवस्थेस काही व्यक्ती धोका पोहोचवू शकतात, असे सांगून काही खासगी व्यक्तींचे दूरध्वनी टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेतली होती. या आधारे त्यांनी काही जणांचे फोन टॅप केले व त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा उल्लेख होता, असे या अहवालात नमूद केले आहे.

या अहवालाच्या आधारे शुक्ला यांच्या विरोधात कारवाईची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे.

शुक्ला यांना फोन टॅपिंगसाठी परवानगी देणारे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे यांना अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. यानुसार कुंटे यांनी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर के ला. यात रश्मी शुक्ला यांनी सरकारची दिशाभूल केल्याचा ठपका कुंटे यांनी ठेवला आहे.

करोनाकाळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. काही अपवाद वगळता २०२० मध्ये पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसारच भारतीय पोलीस सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. २७ जून ते १ सप्टेंबर या काळात एकाही पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली नव्हती. ऑगस्टमध्ये शुक्ला यांनी अहवाल दिला त्या काळात एकाही पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली नव्हती याकडे कुंटे यांनी अहवालात लक्ष वेधले आहे.

शुक्ला यांनी सरकारला अहवाल सादर केला तेव्हा तो पेन ड्राइव्हमध्ये नव्हता. त्याची प्रत त्यांच्याकडून उघड झाल्याचा संशय येतो. हा गुप्त अहवाल त्यांनी उघड केल्याचे निष्पन्न झाल्यास शुक्ला कठोर कारवाईस पात्र ठरतात, असेही कुंटे यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.

या अहवालाचा दाखला देतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आणि सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली होती.

दहशतवादी कृत्ये किंवा दंगली माजविणे हे कारण देत शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती. प्रत्यक्षात त्यांनी या परवानगीचा दुरुपयोग केल्याचा ठपका कुंटे यांनी ठेवला आहे. रश्मी शुक्ला यांनी या परवानगीचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व आपली भेट घेऊन रश्मी शुक्ला यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. कर्क रोगामुळे पतीचे झालेले निधन, मुलांचे शिक्षण अशी विविध कौटुंबिक कारणे देत कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त के ली होती. एक महिला अधिकारी व पतीचे झालेले निधन यातूनच त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखविण्यात आली व तेव्हा शुक्ला यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली नव्हती, असेही कुंटे यांनी अहवालात स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *