परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले हे माहित आहे!
परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले हे माहित आहे !
सरकार व गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र..
मुंबई दि. २२ मार्च
माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.परमवीरसिंग यांचे पत्र ही ठरवून केलेल्या एका कटाचा हिस्सा आहे. परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहितीही आमच्याकडे आहे त्यामुळे चौकशीतून याची सत्यता समोर येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या पत्रावर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
परमवीरसिंग यांनी बदली झाल्यावर पत्र लिहिले आहे. परमवीरसिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहित असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचदरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता असेही नवाब मलिक म्हणाले.
भाजपचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेलाही नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.
रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये.भाजप हायमॉरलीटीच्या वार्ता करते मात्र त्यांचे कोणी संघटनात्मक पदावर नाहीत. मात्र संघाच्या कार्यालयात जाऊन सरकारची रिपोर्टींग करतात ही कोणती मॉरीलिटी. ही कोणती संघटनात्मक प्रोसेस आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
