गुरुपौर्णिमा विशेष- गुरु-शिष्य परंपरा व आजचे गुरुशिष्य !

0
gurupornima 22

मुंबई, दि. ५ जुलै २०२०

भारतीय संस्कृतीत गुरुला महत्वाचे स्थान आहे. ही परंपरा अनादीकाळापासून चालत आलेली आहे. गुरु कोणाला म्हणायचे याबद्दल फारसे मतभेद असणार नाहीत. अज्ञानाचा अंधार नाहीसा करून प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातो तो गुरु. काळनुसार गुरुचे रुप बदलले असेल पण गुरुबदद्लचा आदर मात्र बदलेला नाही. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून पाहिले जाते. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. व्यासांएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अजून झालेले नाहीत अशी एक श्रद्धा आहे. आपल्याकडे रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. या दोघांतले नाते एक वेगळेच असते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या काही जोड्याही प्रसिद्ध आहेत. शुक्राचार्य-जनक, कृष्ण-सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम-लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी ही यादी मोठी आहे.

गुरु शिष्याची ही परंपरा आजच्या आधुनिक युगातही कायम आहे. सचिन तेंडूलकर आणि रमाकांत आचरेकर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि पी. गोपीचंद…ही काही नावे आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात. या नावाजलेल्या व्यक्तींची जशी आपल्याला माहिती आहे तसा आपलाही कोणी ना कोणी गुरु असतोच…आपल्याला जो शिकवतो, ज्ञानार्जन करतो तो आपला गुरुच..

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव यांचे गुरु होते विसोबा खेचर. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करायाची असते. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी मुबलक आहे परंतु घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होत नाही.

गुरुबद्दल आपला आदर व्यक्त करताना म्हणूनच आपण म्हणत असतो…..

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्याबदद्ल आपल्यापौकी अनेकांनी वाचले असेलच. चाणक्यांनी चंद्रगुप्ताच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभार करवून घेतला. चंद्रगुप्ताला सर्वगुणांनी युक्त केले. चंद्रगुप्ताचे शौर्य आणि चाणक्याची बुद्धी यामुळे चंद्रगुप्ताने अनेक युद्धात पराक्रम गाजवला.

त्रेता युगातील वसिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्रांना ब्रह्म आणि क्षात्रतेजाने युक्त असे शिक्षण देऊन त्यांना आदर्श राज्यकारभार करायला शिकवले. आजही आदर्श राज्याला `रामराज्य’ म्हणून संबोधले जाते. प्रभू रामचंद्रसुद्धा अवतारी पुरूष असून कुठलाही निर्णय आपल्या गुरूवर्यांना विचारल्याशिवाय घेत नसत.

पण आता काळ बदलला आहे, शिक्षणपद्धतीतही बदल झाला आहे. आजचा विद्यार्थी शिक्षणासाठी, गुरुगृही किंवा गुरुकुलात नाही तर शाळा, कॉलेजात जातो. प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक व कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट ट्युशन्समुळे एकाच विषयासाठी एकापेक्षा अधिक शिक्षक म्हणजे गुरु, असे चित्र आहे. आजच्या काळातील एकूण परिस्थितीमुळे गुरू-शिष्याचे नाते पहिल्यासारखे राहिलेले नाही हे खरे, पण आजही या नात्याचे महत्त्व कमी झालेले नाही.

व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आपापल्यापरीने अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पे म्हणजे बाल्यावस्था आणि पौगंडावस्था….. ढोबळपणे पाहिले, तर आपण आयुष्यातील सुमारे पंधरा ते वीस वर्षे विद्यार्थीदशेत असतो. त्यामुळे अर्थात व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आपल्या गुरूचा मोठा वाटा असतो आणि म्हणूनच गुरू-शिष्याच्या नात्याला केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नाही तर सर्वार्थाने महत्त्व आहे.

आजच्या काळातील वाढत्या स्पर्धेमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे, विद्यार्थ्यांना पावलोपावली योग्य मार्गदर्शन मिळण्याची अधिक गरज निर्माण झाली आहे. दहावी व बारावी या शिक्षणातील दोन टप्प्यांना कधी नाही इतके महत्त्व आले आहे. या दोन टप्प्यांवरील यश, अपयश जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न बनले आहेत.या दोन्ही तणावपूर्ण टप्प्यांवर, सशक्त, सकारात्मक असे गुरू, शिष्याचे नाते विद्यार्थ्यांसाठी अतिशय हितकारक ठरते.

मग उत्तम गुरू आणि उत्तम शिष्य कोण. ज्या गुरुचे आपल्या विषयावर उत्तम प्रभुत्व आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन जो शिकवतो, विद्यार्थ्यांना उत्साह वाटेल, विषयात रस वाटेल अशा पद्धतीने शिक्षण देतो, विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करतो, वर्गामध्ये संवादी वातावरण तयार करतो, सर्जनशीलता, कल्पकता, उत्तम नियोजनक्षमता, लवचिकपणा, सकारात्मक दृष्टिकोन ज्या व्यक्तीमध्ये असते तो उत्तम गुरु असतो…

… तर ज्याच्यामध्ये शिकण्याची वृत्ती, ती मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी,चौकसपणा, वेळेचे उत्तम नियोजन करणारा आणि प्रामाणिक व प्रयत्नशील असतो तो चांगला शिष्य बनतो..

आज जरी काळ आणि शिक्षण पद्धती बदलली असली तरी गुरू व शिष्याचे नाते जोपासले पाहिजे. दोघांनी परस्परांविषयी आदर, आत्मीयता, विश्वास, सामंजस्य व सहकार्याची भावना ठेवली, मोकळा संवाद ठेवला तर आजही या नात्यातले पावित्र्य अबाधित राहिल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *