दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच!
दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच!
परीक्षा केंद्र आपल्या च शाळेत असेल.
मुंबई, दि. २० मार्च.
स्टेट बोर्डाची दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधी तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे तसेच प्रॅक्टिकल परीक्षा लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.
दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जातो यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
दहावीच्या दरवर्षी प्रात्याक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. बारावी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा पाच ते सहा प्रात्यक्षिकांवरच होणार. विद्यार्थ्यांना पाच प्रयोग शिकवणार आणि त्यावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.
कला / वाणिज्य / व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत असाइनमेंट सादर करावेत. असाइनमेंट सादर करण्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना करोनाची लागण झाल्यास किंवा कंटेन्मेंट झोन, संचारबंदी असल्यास असाइनमेंट सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी.
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या परीक्षा ऑनलाइन होणार का अशी चर्चा होती. त्याला वर्षा गायकवाड यांनी विराम दिला आहे. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटाच्या आधारे विद्यार्थी आणि पालक यांना लोकल मुभा देण्यात येणार आहे.
एखाद्या विद्यार्थ्यामध्ये करोनाची लक्षण आढळली किंवा लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे..
