45 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे !
45 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे !
मुंबई, दि. 18 मार्च:
राज्यात पुढील काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्या जोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत. कोरोना बाधितांमध्ये तरुणही आहेत हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले.
राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली .
महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती मात्र आता काही जिल्ह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. विषाणूचे हे कुठले म्युटेशन किंवा आणखी काही प्रकार आहे का याविषयी मार्गदर्शन व्हावे असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
पहिल्यांदा जेव्हा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात अली तेव्हा बहुतांश टाळेबंदी होतीआणि त्यामुळे रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीतजास्त संपर्क शोधणे सोप्पे होते कारण सर्व परिवार व शेजारीपाजारी घरी असायचे . मात्र आता सर्व व्यवहार सुरु झाल्याने व कडक टाळेबंदी नसल्याने संपर्क शोधणे विशेषतः: मुंबईसारख्या महानगरांत आव्हानात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले . तरीदेखील सर्व आरोग्य व पालिका यंत्रणांना परत एकदा युद्ध पातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात १ मार्च रोजी ७ हजार ७४१ इतके रुग्ण वाढले होते. १५ मार्च रोजी हा एकदा १३ हजार ५२७ इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून १ मार्च रोजी पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे, यावर चाचण्यांची संख्या अधिक वाढविणे गरजेचे आहे असे सादरीकरच्या वेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
