मुंंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे !
मुंंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे !
मुंबई, दि. 17 मार्च:
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अखेर हटवण्यात आले असून हेमंत नगराळे यांची नियुक्ती त्यांच्या जागी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच रजनीश शेठ यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि त्यात सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि हे प्रकरण अधिकच वाढले. या प्रकरणामध्ये नंतर मुंबई पोलीस सीआययूचे अधिकारी सचिन वाझे यांचं देखील नाव समोर आलं. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आलं आहे. एनआयएकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू असून यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेले हेमंत नगराळे हे सन १९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी२०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदावर काम केले आहे. पुढे दोन वर्षांनी, सन २०१८ मध्ये त्यांची नागपूरला बदली करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होत असाना नगराळे पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करत होते. हेमंत नगराळे यांचा १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना हेमंत नगराळे चर्चेच आले होते. त्यावेळी वाशी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेवरील दरोड्याची उकल नगराळे यांनी अवघ्या दोन दिवसात केली होती. हे प्रकरण देशभर गाजले होते. त्यावेळी नगराळे यांचे सर्वत्र कौतुक झाले होते.
