IMG_20210108_164528

आवश्यकता असेल तेथे लॉकडॉऊन !

मुंबई, दि.12 मार्च:
राज्य लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर असतांना जिथे गर्दी होते तिथे कार्यालयांमध्ये, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी नवीन बंधने घालावीच लागतील, येत्या काही दिवसात यासंबधीचे निर्णय होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच आवश्यकता असेल तर शासनाच्या परवानगीने लॉकडॉऊन लावण्याच्या सुचना आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरानाची लाट वाढू नये, शिखर पातळीवर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत, आपल्याकडे पुरेशी आरोग्य सुविधा आज तरी उपलब्ध आहे, त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांना मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावेच लागेल, लस घेतली तरी ही त्रिसुत्री पाळावी लागेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड खाली गेलेली असतांना आता मागील काही दिवसांपासून ती पुन्हा झपाट्याने १२ ते १३ हजार प्रति दिन अशी वाढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु आहे. शासकीय, आरोग्य कर्मचारी कोरोना नियंत्रण, काँटॅक्ट ट्रेसिंग आणि उपचाराच्या कामात गुंतत आहे. आज ही नागरिक कोरोना चाचणी करून घ्यायला घाबरत आहेत. पण तसे न करता नागरिकांनी पुढे येऊन कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जगभरातील अनुभव फार वाईट आहे, ब्राझीलसारख्या देशात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिकडे हाहाकार झाला आहे. तिथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत आहे. ती परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात अजिबात येऊ द्यायची नाही, आपल्याकडे पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचं नाही, त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, त्रिसुत्रीचे पालन करून शासनाला सहकार्य करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *