महाराष्ट्रात २४ तासांत ६२१८ कोरोना रुग्ण !
महाराष्ट्रात २४ तासांत ६२१८ कोरोना रुग्ण !
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी.
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २१८ कोरोना बाधितांची भर पडली आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही सर्वसामान्यांसह सरकार व प्रशासनासाठी देखील चिंताजनक आहे.
अकोला मंडळात आज १ हजार ३९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक ५१५ रुग्ण अमरावती पालिका हद्दीत तर जिल्ह्यात २७१ रुग्णांची नोंद झाली. पुणे मंडळात १२८८ रुग्णांची भर पडली असून त्यात पुणे पालिका हद्दीत ६७९ तर पुणे जिल्ह्यात ३०८ रुग्ण वाढले. पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत २०८ रुग्णांची भर पडली. ठाणे मंडळात १२५० रुग्णांची नोंद झाली असून त्यात सर्वाधिक ६४३ रुग्ण मुंबई पालिका हद्दीत आढळले आहेत. त्यानंतर ठाणे पालिका हद्दीत १४२ रुग्णांची भर पडली आहे. नागपूर विभागात एकूण ८७७ रुग्णांची भर पडली असून त्यात सर्वाधिक ५४४ रुग्ण नागपूर पालिका हद्दीत आढळले आहेत.
दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळत असून, रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक प्रमुख शहरांमध्ये लॉकडाउन व नाईट कर्फ्यूची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना, करोनाचा उद्रेक सुरूच आहे.
