‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा!
‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा!
देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र.
मुंबई, दि. १२ फेब्रवारी:
बीड जिल्ह्यातील तरूणी पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरणही तापले आहे. या तरुणीने आत्महत्या केली की तीला आत्महत्येस प्रवृत्त केले असा संशय व्यक्त केला जात असून राज्यातील एका मंत्र्यांचे नाव या प्रकरणात घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचलकांना पत्र पाठवले असून त्यात ते म्हणतात की, पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण १२ ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे.
ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजाच्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
