देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय !
देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय !
पंतप्रधान मोदींची आंदोलकांना अवमानजनक उपाधी..
नवी दिल्ली, दि. ८ फेब्रुवारी:
देशभर कृषी कायद्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ८० दिवसांपासून ठाण मांडून आहे परंतु मोदी सरकारचा हटवादीपणाही कायम असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी, खलीस्तानवादी, दहशतवादी असे म्हणून बदनाम करण्याचे काम भाजपा व त्यांचे आयटी सेल करत असताना आता पंतप्रधान मोदी यांनीही शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, कुणाचेही आंदोलन असेल तर हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकांना ओळखायला हवं.
हे लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत असतात. नवनव्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे देशाने अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवे. त्यांना स्वतःला नीट उभं राहता येत नाही ते दुसऱ्याच्या आंदोलनात जाऊन बसतात, हीच त्यांची ताकद आहे. हे सर्व आंदोलनजीवी परजीवी असतात. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल, असे मोदी म्हणाले.
