‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं’!
‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं’!
फडणवीसांनी मोदींना सल्ला द्यावा ..
वाशिम दि. 7 फेब्रुवारी :
आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फडणवीसांनी ‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं!’, असा सल्ला द्यावा अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघात आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला सल्ला देताना म्हणतायत की, राज्य सरकारने इंधनावरची कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. पण केंद्रसरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही याची आठवणही जयंत पाटील यांनी फडणवीसांना करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत बसून हुकूमशाहीचा रोग लागला आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. पेट्रोलचे दर शंभरीच्या नजीक पोहोचले आहेत. आपल्या देशाच्या अर्थमंत्री प्रचंड विद्वान आहेत. पेट्रोलवर कर लावा आणि महसूल जमवा हेच केंद्रसरकारचे धोरण झाले आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रसरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली.
जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आयोजित केला असून त्यांनी पहिल्या टप्प्याची सुरुवात विदर्भातून सुरु केली आहे. आज या यात्रेचा दहावा दिवस असून आतापर्यंत ८ जिल्हयामध्ये जयंत पाटील यांनी तालुका आणि विधानसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या आहेत. या दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी इतर पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा दौरा पक्ष संघटनेसाठी फलदायी ठरत असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील नेते व्यक्त करत आहेत.
