नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा.

0
20210205_105148

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा.

मुंबई, दि. 5 फेब्रुवारी :
अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पटोले यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत झिरवळ यांच्याकडेच या पदाचा कार्यभार राहणार आहे.

नाना पटोले यांनी २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

नाना पटोले यांनी बुधवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याचे माध्यमांकडून सांगण्यात येत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे आहेत. त्यांनी काही  दिवसांपूर्वी प्रदेश अध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी त्यांनीच मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता होती. मात्र, नाना पटोले हे नवे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *