‘त्या’ 739 मराठा तरुणांवर अन्याय का?

0
IMG-20210131-WA0047

‘त्या’ 739 मराठा तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतेय?

मुंबई, 31 जानेवारी:
आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा समाजातील 739 तरुणांची (एसईबीसी) लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पुर्ण झाली असताना त्यांना शासन सेवेत का नियुक्ती दिली जात नाही. या तरुणांवर शासन अन्याय करते आहे, त्यांना तातडीने न्याय द्या, अशी विनंती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून आज भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भेट घेतली. व त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. या तरुणांचे म्हणणे ऐकल्यावर तसेच त्यांचे निवेदन स्विकारल्या नंतर आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनीवरून संपर्क करुन या तरुणांच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी लोकसेवा आयोगाने परिक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या या 739 उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करुन प्रक्रिया पुर्ण केली होती तर मग त्यांना नियुक्ती का दिली जात नाही?. याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यात नियुक्ती दिल्या गेल्याचे समजते, मग या 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करते आहे? अन्य समाजाला जसा शासनाने न्याय दिला तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना मिळावा. कुणावरही अन्याय होणार नाही अशी समान न्यायाची भूमिका शासनाने घ्यावी अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केली. या तरुणांचे निवेदन स्विकारुन त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करु अशी ग्वाही आमदार आशिष शेलार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *