कृषी कायद्यावर राष्ट्रपतींचे अजब विधान!
कृषी कायद्यावर राष्ट्रपतींचे अजब विधान!: डॉ. रत्नाकर महाजन.
मुंबई, दि. ३० जानेवारी
मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात
देशभर संताप व्यक्त केला जात असून हे कायदे रद्द करावेत म्हणून लाखो शेतकरी दिल्लीत दोन महिन्यापासून आंदोलन करत आहेत. सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही. सर्व स्तरातून हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत असा सूर निघत असताना राष्ट्रपतींनी हे कायदे शेतकरी हिताचे आहेत असे म्हटल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रपतींच्या भाषणावर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डाॅ. रत्नाकर महाजन म्हणाले की, संसदेच्या संयुक्त बैठकीत बोलताना राष्ट्रपतींनी सर्व संकेत व प्रथा बाजूला ठेवून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे देशातील करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना फायदा झाला असे बेधडक विधान केले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे कायदे संसदेत पास झाले असले तरी उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या अंमलबजाणीसाठी आवश्यक नियमावली (Rules and regulations) अजून तयार नाही.
शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे आणि केंद्र सरकार त्यात आवश्यक त्या सुधारणा, एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास देखील तयार आहे. अशा परिस्थितीत करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना या कायद्यामुळे फायदा झाला, असे राष्ट्रपती महोदय कशाच्या आधारे म्हणत आहेत ? की सरकारने लिहून दिले ते जसेच्या तसे वाचले ? असे डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले .
