काही नेते संघर्षाच्या वेळी मैदानातून पळ काढतात!
काही नेते संघर्षाच्या वेळी मैदानातून पळ काढतात!
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा.
प्रविण दरेकर यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ पुस्तकाचे प्रकाशन.
मुंबई दि. 29 जानेवारी :
आपल्याकडे अनेक नेत्यांना चांगली भाषणं करता येतात. मात्र, संघर्षाची वेळ आल्यावर हेच नेते मैदानातून पळ काढतात. कोरोनाच्या काळात आपण घरात लपून बसणारे नेते पाहिले असतील. मात्र कोरोनोच्या संकटाच्या काळात, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत घरी बसून न राहता सातत्याने सर्व परिस्थितींना धीटपणे सामोरे जाऊन समाजातील कष्टक-यांची दु:ख समजवून घेत सर्व आव्हानांना थेट भिडणारा नेता म्हणजे प्रविण दरेकर आहे. आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात दरेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानाच्या वेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे उद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांची मुक्तकंठाने कौतुक केले. प्रविण दरेकर यांनी आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानाच्या वेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात प्रविण दरेकर यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शरद पवार जे बोलले त्यासंदर्भात आपल्याला वाईट वाटलं पण अशा गोष्टींची काळजी करायची नसते. त्यांनी वडीलधाऱ्यांच्या नात्याने सल्ला दिला असं मानून आपल्या कामाचा ठसा उमटत आहे असे समजून पुढे जात राहायचं. विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात पवार साहेबांची सवय जुनी आहे. विरोधी पक्ष नेते तोडपाणी करतात असे ते एका विरोधी पक्ष नेत्याबद्दल बोलले होते, पण तेच नेते आता त्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही तुमच्या कामाचं मूल्यमापन पूर्ण महाराष्ट्र करत आहे. कोणालाही विचारलं तर तो हेच सांगेल विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीची उंची वाढवणारे काम तुम्ही एका वर्षात केलं आहे असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.
ज्या वेळेस कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. ज्यावेळी कोरोनाची साथ होती. त्यावेळी दरेकर क्वारंटाईन सेंटर्स, कोविड सेंटर्स येथे जीवाची पर्वा न करता हॉस्पिटलमध्ये भेट देऊन तेथील उपाययोजनातील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि त्या परिस्थितीत करावयाचे बदल, याविषयी माहिती जाणून घेत होते. महापालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करत होते. अतिवृष्टीत लाखो शेतकरी संकटात सापडले होते त्यावेळेस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात दरेकर यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचे पंचनामे असतील, पीक विम्याचे अर्ज असतील, तातडीची मदत असेल, नुकसानीचे पॅकेज असेल, याबाबतीत सरकारला जाग करण्याचे काम दरेकर यांनी केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये’, या उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
