वांद्रे शासकीय वसाहतीतील समस्या तातडीने सोडवा!
वांद्रे शासकीय वसाहतीतील समस्या तातडीने सोडवा!
मुंबई, दि 29 जानेवारी:
वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाला दिल्या. वसाहतीच्या पुनर्विकासासंदर्भात विधानमंडळाच्या सभागृहात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आपण लवकरच सर्व संबंधितांसह वसाहतीस प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहिर केले.
विधानभवन येथे वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यादृष्टीने महत्वांच्या विषयांबाबत उपाययोजना करण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रहिवाशांना भेडसावत असलेल्या समस्या, दुरूस्तीकार्य, पुनर्विकास या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष नाना पटोले बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के.टी.पाटील, सहायक अभियंता यु.डी. पालवे आणि श्रीमती दिघावकर, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल, कक्ष अधिकारी रा. मु.वडनेरकर आदिसह संबंधित अधिकारी आणि गव्हर्नमेंट क्वार्टर रेसिडेन्ट असोसिएशनचे अरूण गिते, प्रमोद शेलार, अशोक चव्हाण (चतुर्थ श्रेणी) यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे येथील शासकीय निवासी वसाहतीचे बांधकाम ७० वर्षे जुने असल्याने निवासी कर्मचा-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बैठकीत निवासी कर्मचा-यांच्या वसाहतीसंदर्भातील मोडकळीस आलेले बांधकाम, पिण्याच्या पाण्याची दुरावस्था, वसाहतीत होत असलेले अनधिकृत बांधकाम, समाजमंदिर सभागृह कर्मचारी आणि अधिका-यांच्या कौंटूंबिक कार्यक्रमासाठी वापरास उपलब्ध न होणे, उपलब्ध झाल्यास अवाजवी भाडे आकारण्यात येणे, अशा विविध समस्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जाणून घेतल्या.
शासकीय कर्मचा-यांनाच अशाप्रकारे निवासस्थानासंदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तो नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समर्थ ठरू शकत नसल्याचेही पटोले यांनी यावेळी सांगितले. ठाणे अथवा नवी मुंबई येथे कार्यालयीन बदली झाल्यास शासकीय निवासस्थान सोडावे लागणे आणि शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीनंतर तातडीने निवासस्थान सोडताना पाल्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार व्हावा या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.
शासकीय वसाहतीतील समस्यांसंदर्भात लवकरच अध्यक्ष पटोले बांद्रा येथे भेट देणार आहेत. याचबरोबर माफक दरात मालकी हक्काची घरे देण्यासंदर्भातील प्रस्तावावर सकारात्मक निर्णय शासनस्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
