केंद्राचे सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करू!
केंद्राचे सिंचन प्रकल्प दोन वर्षात पूर्ण केले जातील!
नवी दिल्ली, दि. 28 जानेवारी
पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजना केंद्र शासन पुरस्कृत सिंचन योजनांतर्गत राज्यातील विविध सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण केले जातील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा 2023 पर्यंत पूर्ण केला जाईल, कोविड महासाथीमुळे या प्रकल्पातील कामांची गती मंदावली होती तसेच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विषयासंदर्भात आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. केंद्राकडून पूर्ण मदतीचे आश्वासन मिळाले. या राष्ट्रीय प्रकल्पासाठी केंद्र व राज्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असून या कामांना गती देण्याबाबत आजच्या बैठकीत एकवाक्यता झाली, असल्याचे पाटील म्हणाले.
यासह पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत येणारे 26 प्रकल्प आणि बळीराजा जल संजीवनी योजने अंतर्गत येणाऱ्या 91 प्रकल्पांना केंद्राकडून अर्थसहाय्य केले जाते. या योजनांमधील प्रकाल्पांची कामे अंतिम टप्प्यात असून एकूणच प्रकल्प येत्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण केले जातील. याशिवाय ज्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत अशा प्रकल्पांविषयी राज्यपालांशी चर्चा करून प्रकल्पांना गती देण्याचे काम केले जाईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील जींगाव, सुलवाडे आदी मोठ्या जलसिंचन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा मिळावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली, यासह नदीजोड प्रकल्पासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली, असल्याचे पाटील यांनी सांगितले.
