आरोग्यमंत्री राजेश टोपे Thank You Doctors ! का म्हणाले ?

0
DDDD 22

मुंबई, दि. १ जुलै २०२०

आज आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवस. भारतात हा दिवस पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री तसेच महान डॉक्टर विधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ एक जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस’(Doctor’s Day) साजरा केला जातो. डॉक्टर्स दिवसच्या निमित्ताने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्र लिहून त्यांच्या सेवाला सलाम केला आहे.

या पत्रात टोपे असे म्हणतात की,

प्रिय डॉक्टर्स….

“आज तुमचा दिवस.. डॉक्टर्स डे.. (Doctor’s Day ) त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्यात हवा असतो. कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला. त्या विळख्यातून नागरिकांना सोडवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. आज सगळीकडे धार्मिक स्थळं बंद असताना त्यातील देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ते तुमच्या प्रयत्नामुळे. म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”

“गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच कोरोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. डॉक्टर, तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत, पोलिस आहेत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आहेत. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहेत.

“डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. कोरोना झाला या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पाहतेय. मात्र डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, आपल्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही.”

“तुम्ही कोविड योद्धे ( Corona Warriors ) बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अथकपणे, अविरत दोन हात करताय. आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी जवळपास ९०  हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे. या संकट काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे, तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडतात. आम्ही तुम्ही काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा, असा प्रेमळ दिलासाही सामान्य नागरिकांना आपण देता, डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.”

-राजेश टोपे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *