पवारांच्या दणक्यानंतर राजभवनाचा खुलासा!
पवारांच्या दणक्यानंतर राजभवनाचा खुलासा !
मुंबई, दि. 25 जानेवारी:
शेतक-यांना भेटण्याची वेळ देऊन राज्यपाल गोव्याला गेल्याचे समजताच शेतकरी आंदोलक संतप्त झाले होते. राज्यपालांना भेटल्याशिवाय जाणार नाही हा दृढ निश्चय करून ठाण मांडून बसले होते. आंदोलन नेत्यांनी कोश्यारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यपालांच्या कृतीचा निषेधही करण्यात आला.
या घटनेनंतर राजभवनकडून खुलासा करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे गोवा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे व २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचा खुलासा राज भवनकडून करण्यात आला आहे.
संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना २२ जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक प्रकाश रेडडी यांना २४ जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धते बददल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळयाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेडडी यांना या बाबतचे लेखी पत्र २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते.त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राज भवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार शिष्टमंडळाकडून २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्विकारतील असे देखिल धंनजय शिंदे यांना पुर्वीच कळविण्यात आले होते व तसे स्विकृत असल्याबददल त्यांनी संदेशाव्दारे कळविले होते.
