शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती..
मुंबई, दि. २३ जानेवारी.
शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. प्रतिभाशाली कलावंतापासून महान राजकीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची साक्ष देणारा आहे.
बाळासाहेबांनी त्यांच्या वक्तृत्वं, नेतृत्वं, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मरण करुन अभिवादन केले.
बाळासाहेबांना आदरांजली..
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे कुशल व्यंगचित्रकार व शब्दांवर प्रभुत्व असलेले उत्कृष्ठ वक्ते होते. राजकारणावर त्यांची उत्तम पकड होती. महाराष्ट्राप्रती तळमळ असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
