फडणवीस, चंद्रकांतदादा, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात!
फडणवीस, चंद्रकांतदादा, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात !
मुंबई, दि. 10 जानेवारी:
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढून घेतली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निर्णयावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतलेला असून राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे. महाआघाडी सरकारने या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. कोरोना काळात व त्याआधीही देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून जनतेला दिलासा देण्याचे काम करत होते.त्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते. भंडारा येथेही फडणवीस हेच सर्वप्रथम धावून गेले.
राज्य सरकारने या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम करतच राहतील, असेही उपाध्ये म्हणाले .
