भंडारा जिल्हा रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू!

0
20210109_142404

हृदय पिळवटून टाकणारी घटना..
भंडारा जिल्हा रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू!
भंडारा, दि. 9 जानेवारी:
शनिवारची सकाळ अत्यंत दुःखद घटनेने झाली. भंडा-यातील घटनेने अक्षरशः काळीज पिळवटून टाकले. जग पहाण्याअगोदरच दहा नवजात कळ्या दाट अंधारात जग सोडून गेल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला रात्री अचानक आग लागली आणि या आगीत दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सात बालकांना मात्र वाचवण्यात यश आलं आहे.

शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिले असता त्या कक्षात मोठ्या प्रमाणात धूर होता. तिनं लगेचच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. तातडीनं अग्निशमन दलाला बोलावण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी हाॅस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य केले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळंच ही घटना घडल्याचे गंभीर आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केले. प्रशासकीय यंत्रणांनीही या घटनेची दखल घेत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनेचा आढावा घेतला आहे. राज्य शासनाकडून या घटनेच्या तात्काळ चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *