महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांसाठी अनाथांना प्राधान्य!

0
20210105_170049

महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांसाठी अनाथांना प्राधान्य !

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नांना यश ..

मुंबई, दि. ५ जानेवारी :
महिला व बालविकास विभागाने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या कंत्राटी पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत विभागाच्या मंत्री महोदयांकडे विशेष आग्रह केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून उपरोक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अनाथ उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

याकरिता बच्चू कडू यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. सातत्याने विविध बैठकांद्वारे संबंधितांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला.

दहा हजार अनाथांना लाभ..

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बालगृहामधून 18 वर्षे पूर्ण करून बाहेर पडलेल्या राज्यातील सुमारे दहा हजार अनाथ बंधु भगिनींना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो असा ऐतिहासिक निर्णय आहे.

अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय विभागात नोकरीमध्ये 1 टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते. त्यामध्ये संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक व बहुउद्देशीय कर्मचारी, बालकल्याण समिती व बाल न्याय मंडळावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर, वन स्टॉप सेंटर येथील विविध पदे आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातात. आता यापुढे या पदांवर अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराने महिला व बालविकास विभागातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनाथ प्रमाणपत्र तसेच पदासाठीची शैक्षणिक,
तांत्रिक, शारीरिक आदी आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *