नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष हा ‘ऐतिहासिक क्षण’!
नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण – नाना पटोले
विदर्भाशी असलेले नाते आणखी घट्ट करणार निर्णय – मुख्यमंत्री
सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी
नागपूर, दि. 4 जानेवारी :
नागपूर विधान भवनात कायमस्वरुपी कार्यरत विधिमंडळ कक्षामुळे विदर्भाच्या आकांक्षांना न्याय मिळणार आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर विदर्भासाठी हा दुसरा ऐतिहासिक क्षण असल्याचे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे काढले.
विधानसभा अध्यक्षांसह उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब, क्रीडामंत्री सुनील केदार व्यासपीठावर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे (ऑनलाईन) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते.
नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे वर्षातील एक अधिवेशन नागपूर येथे दरवर्षी होत असते. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर नागपूर येथील विधानमंडळ सचिवालयात कोणतेही कामकाज होत नाही. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेत या ठिकाणी वर्षभर कार्यरत असणारा कायस्वरुपी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कक्षाचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा आज पार पडला.
आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये पटोले यांनी ही घटना महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. ज्यांना सभागृहात सहजासहजी प्रवेश मिळत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून हा ऐतिहासिक सोहळा अनुभवता येत आहे. लोकशाही अधिकाधिक जनताभिमुख करण्याची ही प्रक्रिया असून आता यापुढे विधानमंडळातील ग्रंथालयही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरपाठोपाठ पुणे येथेही विधिमंडळाचा अशाच पद्धतीचा कक्ष सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. अनुशेष दूर करण्यासह विदर्भातील सर्व प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी हा कक्ष सहाय्यभूत ठरेल.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अशा पद्धतीच्या उपाययोजना ही काळाची गरज आहे. पुढील काळात कोरोनासारख्या महामारीच्या आकस्मिक परिस्थितीमध्ये सामूहिक सहभागासाठी अशा पद्धतीच्या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र विधिमंडळ कायम प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागपूर करारामुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे ही अपरिहार्यता आहे. मात्र आता स्थापन झालेल्या कक्षामुळे वर्षभर काम सुरू राहणार आहे. त्यामुळे अधिवेशन अपरिहार्य असले तरी त्यामागची औपचारिकता राहणार नाही. कोरोनासारख्या प्रतिकूल कालावधीतही महाराष्ट्र थांबला नाही. या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र कधी थांबणार नाही. हा संदेश दिला गेला आहे. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. विदर्भाचे प्रश्न केवळ हिवाळी अधिवेशनापुरतेच मर्यादित न राहता त्यांना सदैव न्याय मिळावा हा यामागील उद्देश आहे. विदर्भ आपल्या हृदयात असून या नव्या उपलब्धतेमुळे हे नाते आणखी घट्ट झाले असून भविष्यात विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुंबई येथून शुभेच्छा संदेश देताना नवीन कक्ष शासन आणि विदर्भातील जनता यामधील दुवा म्हणून काम करेल, असे स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या विधानमंडळाची उच्च परंपरा असून त्याला एक नैतिक अधिष्ठान आहे. या नव्या कक्षातून सामान्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संसदीय कामकाज मंत्री ॲड. परब यांनी विदर्भातील लोकप्रतिनिधींना संसदीय लोकशाहीमध्ये लढण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून प्रभावी आयुध मिळाले असल्याचे सांगितले. कोरोना महामारीच्या काळात हिवाळी अधिवेशन घेता आले नाही. मात्र या ठिकाणी सुरु केलेल्या या कक्षाच्यामार्फत अशा अपवादात्मक परिस्थितीत प्रादेशिक सहभागासह अधिवेशन घेतले जाऊ शकते, या शक्यतेला बळकटी मिळाली आहे, असे स्पष्ट केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नव्या उपक्रमाला शुभेच्छा देताना या माध्यमातून विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त यावेळी केली.
नवीन कक्षाचे उद्घाटन….
तत्पूर्वी विधानभवन येथील राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्षामध्ये नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या कक्षाचे उद्घाटन अध्यक्ष श्री.पटोले यांनी दीप प्रज्वलनाने केले. नव्या कक्षामध्ये दोन उपसचिव, दोन अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, दोन सहाय्यक कक्ष अधिकारी, चार लिपिक-टंकलेखक आणि चार शिपाई असा अधिकारी कर्मचारी वर्ग असेल. यापुढील काळात येथे विधिमंडळ समित्यांच्या बैठकाही आयोजित केल्या जातील. त्याचप्रमाणे या विभागातील दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना अधिवेशनापूर्वी प्रश्न, लक्षवेधी आदी सूचना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विविध प्रशिक्षणाची देखील याठिकाणी संधी उपलब्ध केली जाणार आहे. माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे प्रत्येक मान्यवरांनी त्यांचा आपल्या भाषणात नामोल्लेख केला.
