सोलापुरात ९३ वर्षांच्या आजीची कोरोनाला धोबीपछाड !
सोलापूर, दि. ३० जून २०२०
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मोठ-मोठ्या संकटावरही सहज मात करता येऊ शकते. सोलापुरच्या ९३ वर्षांच्या आजीने हे करुन दाखवले आहे. कोरोनाचे नाव घेताच भितीने अनेकांचे हातपाय गळायला लागतात परंतु या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती, वेळेत तपासणी करुन उपचार घेतले आणि आज ठणठणीत बऱ्या होऊन या आजी आपल्या घरी परतल्या आहेत.
सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या या आजीच्या घरात कमावतं कोणी नाही, ६३ वर्षांचा एक मुलगा, दुसरी मुलगी कर्णबधीर अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क या भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती.
भाऊ मृत झाल्याचे तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब १३ जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे.
आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण व डॉक्टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होतो. आजीबाईंनी कोरोनाला धीराने तोंड दिले आणि १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर त्या कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.
“मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, दुपारी आयुर्वेदिक काढा आणि काही औषधे दिली जात होती, यामुळे मला आजारी असल्याचे जाणवलेच नाही. दोनवेळा जेवण करून निवांत झोप घेत होते. घरातल्यापेक्षा चांगली सोय झाली होती, फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे कोंडून असल्याने ओळखीची लोकं बोलायला नसायची”. असे आजीबाई म्हणाल्या.
तर मंडळी कोरोनापासून दूर राहण्यासाठी घरातच राहा, बाहेर गेल्याच तर तोंडाला मास्क लावा,सुरक्षित शारिरिक अंतर ठेवा, हात दिवसातून चार-पाच वेळा साबणाने स्वच्छ धुवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि दुर्दैवाने कोरोनाची लागण झालीच तर न घाबरता धैर्याने तोंड द्या. जबरदस्ती शक्ती व वेळेत उपचार केल्यास कोरोनालाही चितपत करता येते हे या ९३ वर्षांच्या आजीबाईंने दाखवून दिले आहे.
