कोरोनामुळे थांबलेल्या विकासकामांना गती देणार!
कोरोनामुळे थांबलेल्या विकासकामांना गती देणार!
कोरोना योद्ध्यांच्या वारसांना ५० लाखांचा धनादेश.
नागपूर, दि. 3 जानेवारी :
राज्यात कोरोनामुळे अनेक योजनांचे प्राधान्यक्रम बदलवण्यात आले. या काळात आरोग्याला प्राधान्य देत, आरोग्यासाठी निधी वळता करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावली होती. आता या विकासकामांना गती देण्यात येईल. प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घेत काम केले पाहीजे. सध्या व तसेच भविष्यात भेडसावणाऱ्या
कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास, युवक आणि क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले.
कोरोना काळात सेवा बजावताना सावनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील शेंडे यांचे कोविड संसर्गाची बाधा होऊन त्यांचे निधन झाले. येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पत्नी श्रीमती सीमा शेंडे यांना 50 लाख रुपयांचा सानुग्रह धनादेश केदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, सभापती श्रीमती उज्ज्वला बोढारे, शिक्षण व अर्थ सभापती श्रीमती भारती पाटील, सावनेरच्या पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, श्रीमती प्रमिला जाखलेकर, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहायक गटविकास अधिकारी दीपक गरुड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या तीव्र प्रादुर्भावाच्या काळात तो आटोक्यात आणण्यासाठी पोलस प्रशासन, आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागाने समन्वयाने अत्यंत भरीव काम केले. या कठीण काळात योद्ध्यांच्या कार्यतत्परतेमुळेच कोरोना नियंत्रणात आला. या संघर्षात अनेकांनी प्राण गमावले. राज्यात नागपूरसह चार जिल्ह्यात लसीचा ट्रायल रन सुरु होत आहे. कोरोनासह इतरही कठीण काळात राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्रशासन शेतकरी आणि नागरिकांसाठी विविध योजना उत्तमरितीने राबवित आहेत. या योजनांच्या माध्यमातून पात्र व गरजू लाभार्थ्यांना तसेच शेतक-यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनही उत्तम काम करत असून, शेतक-यांना सिंचन विहीर, कालवे, तलाव, बोडी आदी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देत त्यांच्या शेतात पाणी पोहोचवा. शेतक-यांचे प्रश्न,अडी-अडचणी सोडवण्याला प्राधान्य देत त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याच्या सूचना कृषी व सिंचन विभागाच्या अधिका-यांना त्यांनी दिल्या.
