ठाण्यातील डॉक्टरांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव.
ठाण्यातील डॉक्टरांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सोहळ्यात पुरस्कार प्रदान.
ठाणे, दि 2 जानेवारी.
कोविडच्या संकटकाळात ठाणे शहर -जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वच डॉक्टरांनी – वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी प्रचंड मोठं कार्य केले आहे त्यामुळेच कोरोनासारख्या संकटावर आपण हळूहळू मात करत आहोत असे गौरवोद्गार राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काढले. पण, कोरोनाच्या ब्रिटन येथे आढळून आलेल्या दुसऱ्या स्टेनच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात आपल्या सर्वांनाच सतर्क राहावे लागणार असल्याचे शिंदे म्हणाले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या वैद्यकीय सेवेचेही त्यांनी मनापासून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, परिवहन सभापती विलास जोशी, जेष्ठ नगरसेवक राम रेपळे, रमाकांत मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून ठाण्यात राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खा. डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राज्यात कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व्यवस्था कमी पडू नये यासाठी अहोरात्र नि:स्वार्थीपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या राज्यभरातील कोविड योद्धाना ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा सन्मान करत गौरविण्यात आले.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोविड संकट काळात वैद्यकीय सेवा दिलेल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे जाहीर आभार मानले. तर येणाऱ्या काळातही शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही दिली. नवीन वर्षात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची बांधणी जिल्हानिहाय व तालुका स्तरीय करून महाराष्ट्रभर जाळे पसरवा जेणेकरून कोणताही रूग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही अशी सूचना यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
