सोहळा भक्तीचा विठुमाऊलीच्या दारी। नामघोष मुखी जय पांडुरंग हरी।
सोहळा भक्तीचा विठुमाऊलीच्या दारी। नामघोष मुखी जय पांडुरंग हरी।
सोलापूर/पंढरपूर, दि. २९ जून २०२०
आषाढी वारीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नऊ पालख्यांना अटी-शर्थीवर परवानगी दिली आहे. या पालख्या ३० जूनच्या रात्री ९ वाजेपर्यंत पंढरपुरात पोहोचतील. पालख्यांसोबत मानाचे २० वारकरी असतील. त्यांची कोविड-१९ चाचणी झालेली असावी, वृद्ध वारकऱ्यांना वारीत सामील होता येणार नाही. १ जुलैला पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी मंदीर समितीने ठरविलेले मानाचे वारकरीही असतील. स्नान करण्यास पाच वाजेनंतर परवानगी देण्यात आली आहे.
मानाच्या नऊ पालख्या पाच जिल्ह्यातून येणार आहेत. या प्रत्येक पालखीबरोबर २० वारकरी असतील. या नऊ पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू, संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण, संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर, विठ्ठल-रूख्माई संस्थान, कौंडण्यपूर, चांगावटेश्वर देवस्थान, सासवड. दोन जुलैला सकाळपासून मानाच्या पालख्यांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस भेटीचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यानंतर पालख्यांचे पंढरपूर येथून संबंधित संस्थानकडे प्रस्थान होईल.
वारकऱ्यांनी दर्शन व चंद्रभागेत स्नानासाठी विनाकारण गर्दी करू नये. मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आणि मानाच्या पालखी प्रमुखांना प्रवेशपत्रिका पाहूनच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. केवळ कर्तव्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांना परवानगी असेल. वारीमध्ये महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. १५०० पोलीस आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी तैनात केलेली आहे.
आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून गुरुवारी, २ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडता येणार नाही.
