बा विठ्ठला, या कोरोनापासून मुक्ती दे !
पंढरपूर, दि. २८ जून २०२०
‘विठू माउली तू माऊली जगाची आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची!’ या कोरोनाला जगातून घालव व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू दे, असं साकडं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला घातले आहे.
आषाढी एकादशीची वारी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट दिली. महाव्दार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला हे साकडं घातलं.
पांडुरंगाच्या दर्शनानंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे.
भाविकांनी घरातूनच नामस्मरण व पूजा करावी..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. गृहमंत्र्यांना यावेळी वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला.
