अतिवृष्टीनंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पथक महाराष्ट्रात!
अतिवृष्टीनंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पथक महाराष्ट्रात!
औरंगाबाद जिल्ह्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी.
केंद्रीय पथक समितीतील सदस्यांनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
औरंगाबाद, दि 22 डिसेंबर :
राज्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. राज्य सरकारने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून दहा हजार कोटींचे पॅकेज ही दिले पण केंद्रातील मोदी सरकार मात्र ढिम्म राहिले. नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा महत्त्वाचा असतो मात्र दोन महिने त्यांना वेळच मिळाला नाही.आता दोन महिन्यांनंतर ते काय पाहणार आहेत असा संताप शेतकरी व्यक्त करत आहे.
केंद्रीय पथकाने सोमवारी औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन
संवाद साधला.
केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल यांनी पाहणी करून संवाद साधला. अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले.
पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारी, मकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सदस्यांना दिली. ढोरेगाव येथील अहमद जाफर शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्याने, बाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरी, वरखेड येथे विकास उबाळे यांच्या 4 एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
गंता आणि कौल यांनी ‘तुमच्या पिकांची पाहणी केली आहे, पंचनामा झाला आहे, झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळेल’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर वरखेड येथील पाणंद रस्त्याची पाहणी आणि गौतम कांबळे यांच्या शेतातील कांदा लागवाडीचीही पाहणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे, जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहे, त्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली.
