नाम घेता विठुमाऊलीचे…….. !
पंढरपूरची आषाढी वारी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरला जाता येणार नाही. पण घरी बसूनच आपण आपल्या सावळ्या विठ्ठलाचे नामस्मरण करुयात… आषाढीच्या निमित्ताने नामस्मरणाची एक माळ अशीही…..
माणूस नात्याच्या बंधनातून मोकळा झाला की फक्त परमेश्वराचे नाम घेतो, अशी नामस्मरणाची माळ शिरसावंद्य मानणारे गाव म्हणजे माळशिरस. पालखी आता पंढरपूर गाठणार. या आनंदाने सारा गाव भजन कीर्तनात रममाण होतो. टाळ मृदुंग आणि वीणा साक्षात विठ्ठलाला सुद्धा डोलायला लावतात.
“ही मनुष्य जात सकळ, स्वभावतः ची भजनशीळ ”
घरातले नवजात बालक सुद्धा विठुचे नाव घेत टाळ्या वाजवतात. बहीणाबाई तर नवीन आलेली पाने विठुचे भजन करताना बघते. हा संस्कार आम्हा सगळ्यांनाच मिळतो पण टिकेल असे नाही. त्याचे फळ काय असेल ते ही माहिती नाही, पण हे नामःस्मरण चालू असतेच अन असावेही.
भागवतामध्ये एक सुरेख कथा आहे.. पती बाहेर कामाला जातो अन पत्नी देवळात. लोकांना वाटते केवढी भक़्ती. पण एक दिवस पती झोपल्यावर पांघरून घालायला येते. पहाते तर काय पती गाढ झोपलाय पण अखंड हरीनाम सुरू. हे खरे नामस्मरण.
संत तुकाराम महाराज सतत विठ्ठलाचे नामःस्मरण करायचे, ध्यान धारणा करायचे पण मनाची तगमग थांबत नव्हती. घर संसारात लक्ष लागत नव्हते. आता त्यांनी भंडारा डोंगरावर ध्यान धारणा सुरू केली. इकडे आवली मात्र रागावली लग्न लागल्यापासून ती विठ्ठलाला प्रत्येक क्षणी दोष देत होती. संसारात मेटाकुटीस आली होती. तुकारामांच्या जेवणाखाण्याची काळजी घेत होती. आजही ती विठ्ठलाला बोल लावत टोपलीत भाजी भाकरी घेऊन निघाली. तोंड आणि पाय सारख्याच गतीने चालले होते. इतक्यात बाभळीच्या फांदीवर पाय पडला, असंख्य काटे रूतले, जोरात किंचाळली आणि विठ्ठलाला दोष देऊ लागली, रडायला लागली आणि काय आश्चर्य समोरून एक गुराखी गायींना घेऊन आला.डोक्यावर मुंडासे,गळ्यात रानफुलांची माळ… आणि सुंदर बासरी वाजवत आला. आवलीचा पाय हातात घेऊन हळूहळू सगळे काटे काढून निघाला.आवली त्याला भाकरी द्यायला वळली एवढ्यात तो गायब झाला. तिचं ओरडणं ऐकून तुकाराम आले.अवलीने सगळी घटना वर्णन करून सांगितले, तुकाराम आनंदाने नाचू लागले. साक्षात भगवंत येऊन दर्शन देवून गेले. अवलीने केलेले नामस्मरण मोठे ठरले.
म्हणून जीवनातल्या प्रत्येक क्षणी देवाचे नाव घ्या तो कोणत्या न कोणत्या मार्गे भेटतोच.
पांडुरंग हरी !… वासुदेव हरी !!
——००——–
साभार……
रचना.. तुकाराम महाराज
निरूपण..अद्वैता उमराणीकर
संगीत…मानसी देशपांडे
गायक : अभिजीत पंचभाई
टाळ.. प्रसाद पिंपुटकर
चित्र…श्रृती राजेंद्र गलगले
