प. बंगालमध्ये 200 जागा जिंकून सत्ता मिळवू!
प. बंगालमध्ये 200 जागा जिंकून विजय मिळवू !
ममता बॅनर्जींना धक्के देत अमित शहांची जोरदार रणनिती.
कोलकाता, दि. 19 डिसेंबर:
भारतीय जनता पक्षाने आगामी लक्ष्य पश्चिम बंगाल केले असून आगामी विधानसभा निवडणुकीत बंगाल सर करण्याचा मनसुबा पक्का केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या प. बंगाल दौ-यात पहिल्याच दिवशी एका जाहीर सभेत बंगालमध्ये विजयी पताका फडकवण्याचा आपला इरादा बोलून दाखवला.
तृणमुल काँग्रेसला धक्के देत अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा खास सहकारी व विद्यमान 6 आमदारांना भाजपात आणले. मेदिनीपूर येथील सभेला मोठी गर्दी झाली होती. याच सभेत ममता यांचे खास सहकारी सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे अनेक प्रमुख नेते भाजपात सहभागी झाले .
मेदिनापूरच्या सभेत अमित शहा म्हणाले,. प. बंगाल विधानसभा निवडणुकीचे जेव्हा निकाल लागतील तेव्हा २०० पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप येथे सरकार स्थापण्यासाठी सज्ज झालेला असेल. काँग्रेसला तुम्ही तीन दशके दिली. २७ वर्षे कम्युनिस्ट पक्षांना दिली आणि दहा वर्षे ममता दिदींची सत्ता आहे. आता तुम्ही भाजपच्या हाती पाच वर्षे सत्ता द्या, आम्ही पश्चिम बंगालला खऱ्या अर्थाने ‘सोनार बांगला’ करून दाखवू, असे शहा म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. ममता यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडालेले असून ममता बॅनर्जींना त्यांच्या भाच्याला पुढचा मुख्यमंत्री बनवायचे आहे. यासाठी त्यांची सगळी धडपड चालली आहे, असे शहा म्हणाले.
