हे कसले सरकार हे तर आमच्या स्मशानाचे रखवालदार!

0
20201215_174356

मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर फाईलवरचा शेरा बदलला.

हे कसले सरकार हे तर आमच्या स्मशानाचे रखवालदार!

ठाकरे सरकारच्या कारभाराचा शेलार यांनी सभागृहात केला पंचनामा..

मुंबई, दि. 15 डिसेंबर :
कोविडमुळे देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले एवढेच नाही तर घाटकोपर येथील एक महिला गटारात पडते त्यांचा मृतदेह हाजी अली येथे सापडतो. आघाडी सरकारच्या काळात ज्या मृत्यूच्या घटना आणि सर्वत्र मृत्यू, मृत्यू असे वातावरण आहे, ते पाहिले की लोकमान्य टिळक यांनी इंग्रज सरकार विरोधात अग्रलेख लिहून म्हटले होते की, हे कसले सरकार हे तर आमच्या स्मशानाचे रखवालदार, या विधांनाची आज आठवण होते, असे म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना आशिष शेलार यांनी मंत्रालयातील एक गंभीर फाईल घोटाळा उघड केला. आजपर्यंत अनेक घोटाळे या राज्यातील जनतेने पाहिले. त्यापेक्षा अनोखा घोटाळा या आघाडी सरकारच्या काळात घडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागातील पवार नावाच्या अभियंत्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ती फाईल फिरत सचिव, मंत्री यांच्या पर्यंत आल्यावर चौकशीचे आदेश कायम ठेवण्यात आले पण ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर त्यावर लाल शाईने शेरा मारुन चौकशीची गरज नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर ही फाईल पुन्हा संबंधित मंत्र्यांकडे आल्यावर ही बाब निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपण निर्णय बदलला याबाबत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी आपण खालून आलेला निर्णय बदलेला नाही असे सांगितले. मग मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी नंतर या फाईलवर शेरा कुणी मारला? अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर त्यावर शेरे मारले जात असतील तर या सरकारच्या काळातील सगळ्याच निर्णयाच्या फाईलची चौकशी करणे आवश्यक आहे.

गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यात आला नाही.चौकशी करु आणि एफआयआर दाखल करु असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा पद्धतीने राज्यकारभार सुरु आहे असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला.

राज्याच्या एका अतिरिक्त सचिवांवर कॅगने गंभीर ताशेरे ओढले. या अतिरिक्त सचिवांनी संविधानाची शपथ घेतली त्याचा त्यांना विसर पडलाय. या सचिवांनी कॅगच्या अहवालातील नोंदी बदलल्या, कॅगच्या कामात अडथळा आणला, फेरफार केले असे गंभीर ताशेरे कॅगने ओढले आणि या सचिवांची सीबीआय, मुख्य सचिव, लोकायुक्तांमार्फत चौकशी व्हावी व केंद्र शासनाच्या डिओपीटीने कारवाई करावी, अशी शिफारस केली. त्याच सचिवांना आघाडी सरकारने प्रमोशन देत वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार दिला. अशा पध्दतीने राज्य चालवले जात आहे.

दो गज अंतर, मास्क आणि सँनिटायझर हे कोविड काळात महत्त्वाचे होते. त्या शिवाय दुसरा पर्यायही नव्हता. अशावेळी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करण्यात आला. मुंबई महापालिकेने ज्या कंपन्याकडून सँनिटायझर घेतले त्यापैकी अनेक कंपन्या या स्टेशनरी पुरवठादार, घरगुती साधनांची दुरुस्ती करणाऱ्या, वैद्यकीय अवजारे पुरवणारे असून यातील रेव्हणकर ट्रेडर्स ही कंपनी ड्रम वाद्य तयार करणारी असून या कंपन्याना सँनिटायझर पुरविण्याचे काम देण्यात आले. या कंपनीचे संचालक रेव्हणकर हे मुंबईच्या महापौरांचे जावई आहेत. वरळीच्या कोविड सेंटरचे काम महपौरांच्या मुलाला देण्यात आले. अशा प्रकारे कोविड काळात भ्रष्टाचार करुन मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम करण्यात आले. हे आशिष शेलार यांनी सभागृहात उघड केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *