नविन वर्षात मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी?

0
20201215_145603

नविन वर्षात मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी !

ठाकरे सरकार मुंबईकरांना देणार नवीन वर्षाचे गिफ्ट !

मुंबई, दि. 15 डिसेंबर:

कोरोनामुळे सर्वांसाठी लोकल प्रशासनावर असलेली बंदी लवकरच उठवली जाणार आहे. नव्या वर्षात मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

नऊ महिन्यांपासून लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी बंद आहे. सध्या लोकल सुरू असल्या तरी त्यातून प्रवास करण्याची मुभा सरकारी कर्मचारी व काही लोकांनाच दिलेली आहे.सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, ‘आता मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी लवकरच निर्णय होणार आहे. थोडा वेळ जाईल आणि जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. एकूण घटती रुग्णसंख्या, रुग्ण बरं होण्याचं प्रमाण तसंच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. ३१ डिसेंबरनंतर नवीन वर्ष सुरु झालं की ट्रेनला पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल’.

गणपतीनंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली. मात्र दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. पण आता परिस्थितीत सुधारणा झाली असून मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपेल अशी चिन्हं दिसत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *