बोलणी फिस्कटली; आता आंदोलन आणखी तीव्र!
बोलणी फिस्कटली; आता आंदोलन आणखी तीव्र!
देशभर रेल रोको, दिल्लीला घेराव, भाजपा नेत्यांना घेराव
नवी दिल्ली, दि. 11 डिसेंबर :
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतक-यांचे आंदोलन कायम असून मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही. सरकार व शेतकरी संघटना यांच्यातील बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाने आता आक्रमक रुप धारण केले आहे. आपला संघर्ष आणखी तीव्र करत १४ डिसेंबरपासून देशभरात भाजप नेत्यांना घेराव व जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्याची तयारी शेतकरी संघटनांनी केली आहे.
कृषी कायद्यांचा निषेध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा शुक्रवारी हा १६ वा दिवस आहे. केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास शेतक-यांनी नकार देत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.
12 तारखेपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे तसेच 14 तारखेपर्यंत भाजप नेत्यांचे घर आणि कार्यालयांना घेराव घालतील. आता आम्ही मागे हटणार नाही. अनेक राज्यांतून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. 12 तारखेपर्यंत ते दिल्लीला पोहोचतील. संपूर्ण दिल्लीला आम्ही घेराव घालू, असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर सध्यातरी सरकारकडून कुठलाही नवा प्रस्ताव पाठवला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवर शेतकऱ्यांचं समाधान करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही बैठक पार पडली. सरकारच्या वतीने केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल हे शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. पण 16 दिवसानंतरही यातून मार्ग निघालेला नाही.
मोदी सरकारने कृषी कायदे रद्द नाही केल्यास देशभरात रेल्वे रोखण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. १२ डिसेंबर रोजी दिल्लीला घेराव घालण्याचाही इशारा दिला आहे .
