राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक!

0
Maharaj 11

राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक!

मुंबई दि. २६ जून २०२०

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.

राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते.महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *