डिसलेंसारख्यांच्या मदतीने राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार!

0
IMG_20201207_222352

डिसलेंसारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांचा सत्कार.

मुंबई, दि. 7 डिसेंबर :
जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले , डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते.

कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी सुचविले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *