मेळघाटच्या मुलांचे ‘नीट’ परीक्षेतील सुयश ही परिवर्तनाची नांदी.

0
IMG_20201207_215129

मेळघाटच्या मुलांचे ‘नीट’ परीक्षेतील सुयश ही परिवर्तनाची नांदी.

अमरावती, दि. ७ डिसेंबर :
कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा अभाव असताना तेथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मेळघाटची ही लेकरे डॉक्टर होऊन पुन्हा आपल्या भूमीत सेवा बजावणार आहेत. मेळघाटातील परिवर्तनाची ही नांदी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवनात आदिवासी विकास प्रकल्पातर्फे नीट परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांचा हृद्य सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आदिवासी अपर आयुक्त विनोद पाटील, प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, सहायक प्रकल्प अधिकारी एस. टी. खिल्लारे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित  होते.

ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट संस्थेच्या उलगुलान उपक्रमामुळे मेळघाटच्या दुर्गम गावांतील तेरा विद्यार्थी ‘नीट’ उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. हा ऐतिहासिक व आम्हा सर्वांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. सुविधांचा अभाव असतानाही दुर्दम्य इच्छा व अथक परिश्रमाची बळावर बारा- बारा तास अभ्यास करून मेळघाटच्या या मुलांनी यश संपादित केले आहे.  डॉक्टर होऊन ही मुले पुन्हा मेळघाटच्या सेवेत परतणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या भूमी व समाजाप्रती ते निश्चित बांधिलकी जपतील, असा मला विश्वास आहे.

कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधा: पालकमंत्री.

विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनण्याची पहिली पायरी चढलेली आहे. यापुढेही त्यांनी दृढ निश्चय कायम ठेवून डॉक्टर बनूनच मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडावे. तुमच्यासोबत शिकण्यासाठी महानगरांतून, शहरांतून मुले येतील. त्यांच्यासोबत वावरताना आपली भाषा किंवा इतर कशाही बाबतीत कुठलाही न्यूनगंड बाळगू नका. तुमची गुणवत्ता उज्ज्वल आहे. कुठलीही अडचण आल्यास थेट मला, आमदारसाहेबांना किंवा प्रशासनाशी संपर्क साधा. आम्ही सगळे तुमच्यापाठीशी आहोत, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी  विद्यार्थ्यांना दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *