राहुल गांधींना समजून घेण्यात पवार कमी पडले!
राहुल गांधींना समजून घेण्यात पवार कमी पडले!
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये तणाव
मुंबई, दि. ७ डिसेंबर :
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून उठलेले वादळ अजून शांत झालेले दिसत नाही. शरद पवार यांच्या विधानावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
थोरात म्हणाले की, ‘शरद पवार यांच्या ज्येष्ठत्वाचा आम्ही मान राखतो मात्र राहुल गांधी यांना समजून घेण्यात ते कमी पडले असे मला वाटते. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष संघटन पातळीवर पुन्हा एकदा मजबूत होत आहे. राहुल यांना जीवनात अनेक दु:ख आणि आघात झेलावे लागले आहेत. त्यानंतरही न डगमगता ते समर्थपणे नेतृत्व करत आहेत आणि यापुढेही ते पक्षाला नेतृत्व देतील.
राहुल गांधी यांच्याबद्दलच्या विधानावर सर्वात आधी काँग्रेस कार्याध्यक्ष, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणे टाळावे आणि आघाडी धर्माचे पालन सर्वांनी करावे असे ट्विट त्यांनी केले होते. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.
