विरोधकांचा ‘भारत बंद’ केवळ राजकीय फार्स!
कृषी कायदे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारे.
शिर्डी, दि. 7 डिसेंबर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने लागू केलेल्या कृषी विधेयकाला राजकीय हेतूने होत असलेला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांचा भारत बंद केवळ राजकीय फार्स असून,केंद्र सरकारच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनीच आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन माजी कृषी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी नगरपंचायतीचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचा पदग्रहण समारंभ आ.विखे पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकर्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.त्यांनतर पत्रकारांशी बोलताना आ.विखे पाटील यांनी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदवर सडकून टिका केली. काही पक्षाच्या वतीने आयोजित केलेला बंद केवळ राजकीय हेतूने प्रेरीत असल्याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की ज्यांनी माॅडेल अॅक्ट देशात आणला तेच आता या कृषी विधेयकाला विरोध करीत असल्याचे आश्चर्य वाटते.राज्याच आम्ही सतेत असताना आम्हालाही या माॅडेल अॅक्टचे समर्थन करण्यास सांगण्यात आले. कृषी क्षेत्रातील या तरतूदीच आता कायद्याच्या माध्यमातून लागू करण्यात आल्यानंतर त्याला आता विरोध काॽ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे हे देशातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारे आहेत.परंतू या कायद्याला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचा आरोप आ.विखे पाटील यांनी केला.
नविन कृषी धोरणामुळे देशातील शेतकरी आत्मनिर्भरतेने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच भारत बंदला शेतकऱ्यांनीच विरोध करून केंद्र सरकारच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन आ.विखे यांनी केले.
शिर्डी संस्थानने येणा-या भाविकांना भारतीय पोषाखात येण्याबाबत केलेल्या आवाहनावर भाष्य करताना आ.विखे पाटील यांनी सांगितले की याबाबत संस्थानने अधिक भूमिका स्पष्ट करण्याची गरज असून बाहेरच्या लोकांनी येवून शिर्डीत हस्तक्षेप करण्याची गरज नाही.शिर्डी आणि ग्रामस्थ याबाबत जो निर्णय घेतील त्याबरोबरच आपण असल्याचे त्यांनी नमूद केले.
