ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू!
ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची गरज.
काही विघातक शक्तींकडून समाजात मतभेत निर्माण करण्याचा प्रयत्न.
पुणे,दि. 28 नोव्हेंबर :
ओबीसी समाज हा नेहमीच मराठा आरक्षणाला सपोर्ट करत असतांना समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून हा लढा वेगळ्या दिशेने जातोय कि काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर येऊन आपली ताकद दाखविण्याची गरज आहे. जर कुणाच्या न्याय, हक्कावर आरक्षणावर गदा येणार असेल तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लढा उभारल्याशिवाय राहणार असे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाही. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिले गेले. त्यानंतर पुन्हा फडणवीस सरकारने त्यासाठी दुसरा कायदा केला. त्याला देखील आपण पाठींबा दिला असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका आपण मांडली. ही सर्व पक्षीय भूमिका असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने नेहमीच मराठा आरक्षणाला पाठींबा दिलेला आहे, असेही ते म्हणाले.
