सगळ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे, ही धमकी नव्हती का?

0
20201128_155250

सगळ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे ही धमकी नव्हती का?
फडणवीसांनीही मुख्यमंत्री असताना धमकीची भाषा वापरली होती…
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर:
महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधत मुख्यमंत्री धमकावण्याची भाषा करत आहेत असा आरोप केला होता. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

राऊत म्हणाले, विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत धमकीची भाषा केली. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्यं आहेत जी धमकी वाटू शकतात असंही संजय राऊत म्हणाले. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का?

राऊत पुढे म्हणाले की, सामनामधली मुलाखत देवेंद्र फडणवीस यांनी वाचली आणि पाहिली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा नेमकी कुठे वापरली यावर अंडरलाइन केलं असतं तर मला त्यावर उत्तर देता आलं असतं. पण त्यांनी असं काही सांगितलंच नाही.
देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधकांच्या कुंडल्या हातात घेऊन बसलो आहे अशी भाषा केली होती. त्यांची अशी अनेक वक्तव्यं माझ्या स्मरणात आहेत. जर एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागत असेल तर त्यांना उत्तर देणं मुख्यमंत्र्यांचं काम आहेच.” असंही संजय राऊत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *