शासकीय महापुजेवेळी गाभाऱ्यात फक्त ८ जणच!
विठुरायाच्या महापुजेस गाभाऱ्यात फक्त ८ जणच.
कोरोना सावटाखाली मर्यादीत स्वरुपात कार्तिकी वारी.
पंढरपूर, दि. २५ नोव्हेंबर:
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य व इतर अशा फक्त २५ जणांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पण पुजेसाठी गाभाऱ्यात पवार कुटुंबासह केवळ पुजारी व मानाचे वारकरी अशा आठ जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सपत्नीक पहाटे दोन वाजता विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेसाठी येतील. पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत विठुरायाची महापूजा होईल, त्यानंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत रुक्मिणी मातेची महापूजा होईल. ही पूजा झाल्यानंतर तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी दाम्पत्य यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने केला जाणार आहे.
दरवर्षी कार्तिकी महापूजेच्या वेळी दोनशे पेक्षा जास्त व्हीआयपी उपस्थित असतात मात्र, यंदा ही संख्या मर्यादित करुन फक्त २५ जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे कार्तिकी सोहळ्याआधी मंदिर समिती अध्यक्ष, अधिकारी, पुजारी व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. मंदिरात ठराविक वेळेने सॅनिटायजेशन केले जात आहे.
