राज्यातील 9 हजार शाळा सुरू, उपस्थिती अत्यल्प!
राज्यातील 9 हजार शाळा सुरू, उपस्थिती मात्र अत्यल्प !
ग्रामीण भागातील व जि. प. शाळा मोठ्या संख्येने सुरु..
मुंबई, पुणे, ठाणेसह महापालिका क्षेत्रातील शाळा मात्र बंदच !
मुंबई, दि. 24 नोव्हेंबर:
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची घंटा आठ महिन्यांनंतर वाजली. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात असून एकूण ९ हजार १२७ शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक भागांत विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आहे. सरासरी पाच टक्के विद्यार्थीच उपस्थित होते. अनेक भागांतील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत तर पालकांची संमतीपत्रेही शाळांकडे जमा झालेली नाहीत.
शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र मुंबई, ठाणे, पुणेसह अनेक महानगरपालिकांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्यास नकार दिला. जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच ग्रामिण भागांतील शाळा सुरू झाल्या आहेत.
सोमवारी सुमारे ३५ टक्के शाळा सुरू झाल्या. दोन लाख ९९ हजार १९३ विद्यार्थांनी हजेरी लावली. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार २५ हजार ८६६ शाळांपैकी नऊ हजार १२७ शाळा सुरु झाल्या.
अमरावती जिल्ह्यात सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अवघे ०.८ टक्के इतकेच होते. गडचिरोली जिल्ह्यात ९२.२ टक्के शाळा सुरू होत्या. सोलापूर जिल्ह्यात ८६.५ टक्के शाळा सुरू झाल्या आणि सर्वात जास्त ३४ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली.
मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, हिंगोली येथील शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
राज्यातील दोन लाख ७५ हजार ४७० शिक्षकांपैकी एक लाख ४१ हजार ७२० शिक्षकांची करोना चाचणी पूर्ण झाली आहे. तर यापैकी १३५३ शिचकांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर ४४ हजार ३१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २९० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्या आहेत.
