आता आझाद यांचा काँग्रेसला घरचा आहेर!
आता आझाद यांचा पक्षाला घरचा आहेर.
पंचतारांकित संस्कृतीतून बाहेर या….
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर:
काँग्रेस पक्षात सुरु असलेला असंतोष थांबायचे काही नाव घेत नाही. बिहार विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या कामगिरीनंतर पुन्हा पक्षातून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
आझाद म्हणतात, ‘आमच्या नेत्यांची मुख्य समस्या म्हणजे तिकीट मिळाल्यानंतर सर्वात आधी ते फाईव्ह स्टार हॉटेल बूक करणार. तिथेही त्यांना डिलक्स रुम हवा असतो. एसी कारशिवाय ते बाहेर पडणार नाहीत. रस्ते चांगले नाहीत अशा ठिकाणी ते जाणार नाहीत. फाईव्ह स्टार हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत. जोपर्यंत ही संस्कृती बदलत नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाही.
आझाद पुढे म्हणाले, ‘अनेकजण नेतृत्वाला दोष देत आहे पण ब्लॉक किंवा जिल्ह्यातील नेत्यांचा सर्वसामान्यांसोबतचा संपर्क तुटला आहे. जेव्हा कोणाला पद मिळतं तेव्हा ते लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड छापतात आणि आपलं काम संपलं असं समजतात. पण इथेच खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होते”.
आपण गांधी कुटुंबाला दोष देत नाही. याचे कारण म्हणजे करोना महासाथीमुळे फार काही केले जाऊ शकणार नाही. पक्षाला राष्ट्रीय स्तरावर पर्याय हवा असेल तसेच पक्षाला उभारी आणायची असेल, तर आता काँग्रेस नेतृत्वाने निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही आझाद म्हणाले.
