… हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे!: जयंत पाटील
मुंबई दि. २४ जून २०२०
महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधी यांच्या विचारांचा विजय आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी वरील भाष्य केले आहे. महात्मा गांधी यांची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी ठाम धारणा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, मराठी नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल असा खुलासाही जयंत पाटील यांनी केला आहे.
