सदोष खते, बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई व्हावी: नाना पटोले
नवी दिल्ली: दि. २४ जून २०२०
शेतकरी सर्व बाजूने नाडला जात असताना बियाणे, खत कंपन्यांही बोगस माल पुरवून त्यांची फसवणूक करत आहेत. पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याचा असंतोष शेतकरीवर्गातून केला जात आहे. या प्रश्नी आता विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष घातले आहे. सदोष खते, बियाणे, कीटकनाशक बविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे.
कृषी भवन येथे पटोले यांनी तोमर यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसमोर असलेल्या या गंभीर समस्येवर सविस्तरपणे चर्चा केली. शेतकरी वर्षभर मेहनत करून पीक घेत असतात त्यात त्यांना खत कंपन्या, बियाणे कंपन्या, कीटकनाशक औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या सदोष मालाची निर्मिती करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात. त्यामुळे शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत येतो. अशा बनावटी खत, बियाणे, कीटकनाशक निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) सारख्या कायद्याचा वापर करून कडक कारवाई करावी अशी मागणी पटोले यांनी केली.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कारवाईचे अधिकार केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने केंद्र शासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक शक्य तितक्या लवकर रोखावी, अशी विनंती पटोले यांनी केली. केंद्रीय मंत्री तोमर यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे पटोले यांनी बैठकी नंतर सांगितले.
