मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच !
मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच.
कोरोनाचे संकट पाहून BMC चा निर्णय.
मुंबई, दि. २० नोव्हेंबर:
मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागल्याने महानगरपालिकेने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येतील असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करावेत असे म्हटले आहे. शाळा प्रशासाने त्यासाठी हालचालीही सुरु केल्या आहेत. परंतु मुंबईसह राज्यातील करोनाचे सावट अजूनही कमी झालेले नाही. उलट दसरा दिवाळीनंतर गर्दी वाढली असून कोरोनाचा धोकाही वाढला आहे.
मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता लक्षात घेता ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहेच, शिवाय मुंबई महापालिकेला तयारीसाठी वेळ मिळावा ही देखील त्यामागील भूमिका आहे.
मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचे सॅनिटायझेशन होणेही गरजेचे आहे. आता हळूहळू या सेंटरची संख्या कमी केलेली आहे. अजून अनेक शाळांचे सॅनिटायझेशन झालेले नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणे हे प्रशासनासाठी गरजेचे आहे.
