मुंबईला दिल्लीचे गुलाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न.
मुंबईला वेगळं करण्यासाठी भाजपाचं राजकारण…
मुंबई, दि. 19 नोव्हेंबर:
मुंबई महानगर पालिकेवर कोणाचा भगवा झेंडा फडकणार यावर आतापासूनच तुंबळ टोलेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना व भाजपा यांच्यात आमचाच भगवा स्वच्छ व पवित्र असल्याचा दावा केला जात आहे. मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणार अशी घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच शिवसेनेने त्यांना चोख उत्तर दिले आहे.
शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपावर तोफ डागली. ते म्हणाले, ‘भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले पन्नास वर्षे सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचं आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हात जळून खाक होतील.
