बीडची घटना दुर्दैवी; स्पेशल टास्क फोर्स नेमून चौकशी करा.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी.
मुंबई दि. १५ नोव्हेंबर:
बीड जिल्हयातील येळंबघाट येथे तरूणीला जिवंत जाळण्यात आल्याची घटना अतिशय दुर्दैवी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
नांदेड जिल्हयातील एका तरूणीला येळंबघाट परिसरात ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार हा अतिशय दुर्दैवी आहे, एखाद्याला जिवंत जाळणं हेच मुळात वेदनादायी आहे. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडताहेत याच दुःख वाटतयं. या घटनेचा मी निषेध करते.
ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने मन सुन्न झाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून तात्काळ घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच स्पेशल टास्क फोर्स नेमून याची चौकशी करावी.
यासंदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजच पत्र लिहित आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
